समाजकार्य - व्यसनमुक्त समाज

महाराजांनी आपल्या रोजच्या कीर्तनात आणि कीर्तनानंतर अथवा प्रवचनातून केलेल्या उपदेशाच्या, आवाहनाच्या सादेला प्रतिसाद देत लाखो लोक त्यांच्या हातून पंढरीच्या पांडुरंगाची पवित्र तुळशीमाळ आपल्या गळ्यात धारण करत आहेत.रोजच्या कीर्तनानंतर तो एक कीर्तनाइतकाच महत्वाचा कार्यक्रम ठरत आहे.कारण त्या माळेच्या पवित्र बंधनामुळे व्यसन सोडून चांगले जीवन जगण्याचा पक्का निश्चय करण्यास गुरुकृपेने मन दृढ राहते.परिणाम संपूर्ण कुटूंबच सात्विक जीवन जगु लागते.

तुलसीमाला धारण करताना नंतर पाळावयाचे नियम महाराज लिखीत स्वरुपात देतात,ते असेः-

तुळशीची माळ घालुन गुरुमुखाद्वारे ‘ जय जय रामकृष्णहरी ’ मंत्र घेणे हाच गुरु अनुग्रह होय. घातलेली तुळशीमाळ कधीही काढू नये. माळ घातल्यानंतर आपण वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ अशा सातारकर परंपरेशी निगडीत झालो ही खूणगाठ बांधावी. त्या परंपरेतून वर्षभर जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना हजर राहावे आणि विशेष म्हणजे प्रतिवर्षी श्री क्षेत्र दुधिवरे येथे २६ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी जो सप्ताह होतो त्या सप्ताहास उपस्थित राहावे.

मानसपूजा

सकाळी उठल्याबरोबर प्रथम आराध्य दैवत श्रीपांडुरंग व श्री संताची मानसपूजा करावी. देवाला व संतांना पंचामृताने स्नान घालून अंग पुसून उत्तम कपडे घालावेत, नंतर मस्तकाला व चरणाला गंध- बुक्का लावावा. गळ्यामध्ये तुळशीचा हार घालावा व फुले वाहावीत. आरती करावी व नैवेद्य दाखवून प्रसाद सेवन करावा. विडा देऊन तांबुल प्राशन करावे व मस्तक ठेवून प्रार्थना करावी की, “मायबापा, मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा.”

 • स्नान झाल्यानंतर देवपूजा करुन ‘जय जय रामकृष्णहरी ’ नावाची एक जपमाळ जपावी. रामकृष्णहरी हा बीजमंत्र आहे, त्याच्या नित्य जपाने व पठनाने उपासना फलद्रूप होते.

 • श्री जगद्गुरु तुकोबाराया आपल्या एका अभंगात म्हणतात,
  रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ।।
  याहूनि आणीक नाहीं पैं साधन । वाहातसें आण विठोबाची ।।

 • तर श्री ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात,
  रामकृष्णनामे ही दोन्ही साजिरी । हृदयमंदिरीं स्मरा का रे ।।

 • जप झाल्यानंतर श्री ज्ञानेश्वरीचे एक पान तरी नित्यनेमाने वाचावे व वारकरी संप्रदायाच्या परंपरेतील इतर संताच्या वाड.मयाचेही आळीपाळीने पारायण करावे.( श्री तुकाराम महाराजांचा गाथा, श्री नामदेव महाराजांचा गाथा, श्री एकनाथ महाराजांचे भागवत, भावार्थ रामायण व श्री निवृत्तीनाथ, श्री सोपानकाका, श्री मुक्ताबाई व निळोबारायांचे अभंग वाड.मयापर्यंत.)

 • संध्याकाळी आपली नोकरी अथवा व्यवसाय आटोपल्यानंतर देवाला व संतांना उदबत्ती ओवाळून प्रथम पंचपदी ‘भजनीमालिके’ तील पाच अभंग म्हणावेत व नंतर हरिपाठ म्हणावा. रात्री श्री पांडुरंगाला, श्री संतांना वंदन करुन प्रभुचे नामस्मरण करत झोपी जावे, ही वारकरी संप्रायाची दिनचर्या होय.

 • वारकरी संप्रदायाची तुळशीमाळ घातलेल्यानीं मांस-मच्छी, गुटखा खाऊ नये, दारु पिऊ नये, जुगार खेळू नये. पुरुष असेल तर परस्त्री रुक्मिणीमातेसमान व स्त्री असेल परपुरुष श्री पांडुरंगासमान मानावा.

 • घातलेली माळ कधीही काढू नये. माळ गळ्यात असल्याशिवाय अन्नग्रहण करु नये. माळ तुटली अथवा खराब झाल्यास दुसरी घालावी पण एकदा घातल्यावर ती काढू नये.
  पण पंधरा दिवसाचे एकादशीला ( शुध्द,वद्य) उपवास करावा. हरिकीतर्नाला जावे.

 • वर्षातून एक वारी पंढरीची, एक वारी संत ज्ञानेश्वर माऊलीची व श्री तुकाराम महाराजांची करावी. ज्यांना भरपूर सवड मिळेल त्यांनीं आषाढी वारी श्री माऊलीचे पालखीबरोबर श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पर्यंत दरवर्षी करावी. ज्यांना सवड कमी असेल त्यांनी जिथे जमेल तिथे दिंडीत सामील व्हावे, ज्यानां अगदी कमी सवड असेल त्यानीं आषाढ शुध्द दशमीला पंढरीत यावे व कमीतकमी व्दादशी अथवा पौर्णिमेच्या काल्यापर्यंत राहावे. कार्तिक वद्यामध्ये सर्वानीं श्री ज्ञानेश्वर माऊलीची आळंदी वारी व त्या वारीला जोडूनच श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांची देहूची वारी करावी. निदान आषाढी वारीचे वेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पंढरपूरला यावे.